Home सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास….

सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास….


sindhutai sapkal life journey_
‘अनाथांची माय’ म्हणून संपूर्ण मानवजातीत ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली!!!

वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधूताईंची कथा अतिशय संघर्षमय अशीच आहे. महिलांवर होणा-या अन्यायाविरोधात त्या नेहमी पेटून उठत होत्या. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला. त्यांच्यावर अनेक आरोप झाले, त्यांचे चारित्र्य मलीन करण्याचा प्रयत्न झाला. सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधूताईंचा संघर्ष. बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या.

मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधूताई सपकाळ या ‘अनाथांच्या आई’ झाल्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभ्या केलेल्या कामाची राज्यासह राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली. सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा… पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे.

कधी रेल्वेत राहिल्या, तर कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. भुकेलाच त्या आपली प्रेरणा मानत होत्या. स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि नंतर तो चांगलाच फुलला.

दरम्यान, सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, इचलकरंजीचा प्रतिष्ठित ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ इ. उल्लेखनीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना ‘आनंदमयी पुरस्कार’ही मिळाला आहे. पंजाबमधील लुधियानाच्या ‘सत्पाल मित्तल राष्ट्रीय पारितोषिकाच्याही त्या मानकरी आहेत. या पुरस्कारांसह इतर शेकडो पुरस्कार आणि सन्मानचिन्हे देऊन समाजातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.

सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे….

(सौजन्य- ‘महाराष्ट्र टाईम्स’)