सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिकणे सुरु रहावे यासाठी ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे‘तर्फे ऑनलाईन पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद व लॉकडाऊनमुळे (Corona lockdown) बहुतांश मुले घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या सर्व बाबीचा विचार करून दर शनिवारी आता ऑनलाईन पद्धतीने ‘शिकू आनंदे’ (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. 3 जुलै पासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी होत असून घरबसल्या शारीरिक व्यायामही होत आहे.
मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमध्ये https://youtu.be/pomXmGteUL4 या यु ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असण्याकरिता ड्रॉईंग कागद, पेन्सिल, खोडरबर, वॉटर कलर, स्केच पेन, पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.